Debating/Elocution Competition

वक्तृत्व कला

बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. म्हणूनच वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहायला हवे.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी वक्तृत्वाची साधी, सोपी आणि सरळ व्याख्या केलेली आहे. ते म्हणत, ‘एखाद्याचे बोलणे ऐकत राहावे असे ऐकणाऱ्याला वाटते तेव्हा बोलणाऱ्याच्या बोलण्यातून आविर्भूत होणारे, आविष्कृत होणारे आणि प्रकट होणारे ते वक्तृत्व.’

एखाद्याजवळ उदंड ज्ञान असते; पण ते इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली शब्दशक्ती नसते. अनेकांजवळ शब्दशक्ती असते, पण ज्याच्यासाठी ती वापरायची ते ज्ञान नसते. ग्रंथांचा उदय होण्यापूर्वी वक्तृत्वाने फिरती ज्ञानपोई चालवली. बोलणे हे साहित्याचे पहिले रूप आहे. आरंभीचे बहुतांशी साहित्य खऱ्या अर्थाने वाङ्मयच होते. संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी आधी सांगितली नंतर सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली. ‘ऐसी अक्षरे रसिकें। मेळवीन’ अशी प्रज्ञा असणाऱ्या ज्ञानेश्वरांनीदेखील साहित्याचे पहिले रूप प्रधान मानले. कौरव पांडवांच्या युद्धात हतबल झालेल्या अर्जुनाला उभे करण्यासाठी श्रीकृष्णाने सगळी शस्त्रे बाजूला ठेवून शेवटी वक्तृत्वाचे शस्त्र हाती घेतले आणि अर्जुनाला गीता सांगितली इतके वक्तृत्वाचे मोठेपण आहे.

शब्द हे वक्तृत्वाचे शरीर, विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात. शब्दशक्तीचे गर्वयुक्त प्रदर्शन करण्यापेक्षा वक्त्यांनी आपली ज्ञानशक्ती वाढवली, तर त्या ज्ञानशक्तीपुढे श्रोते आदराने नतमस्तक होतात.

यातच वक्तृत्वाचा खरा आनंद आहे. त्यातूनच वक्तृत्वाला अभिप्रेत असणारे काम होणार आहे. गोमांतक कवी सोहिरोबा आंबिये म्हणत,

विवेकाची ठरेल ओल । जे बोलायचे ते ऐसे बोल ।

आपुले मते उगीच चिखल । कालवू नको रे ॥

उत्तम वक्ता होण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्याने प्रथम उत्तम श्रोता झाले पाहिजे. अनेकांची व्याख्याने ऐकली पाहिजेत. वक्तृत्वाचे नानाविध आकार आणि प्रकार अनुभवले पाहिजेत. श्रवणभक्ती मनोभावे केली पाहिजे. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचक होता आले पाहिजे.

वाचून, थांबून, विचार करून पुढचे वाचले पाहिजे. जसे खाल्लेले पचविल्याशिवाय माणसाची प्रकृती सुदृढ होत नाही, तसे वाचलेलेही पचवावे लागते. काय वाचले, कुठे वाचले, कशात वाचले, याच्या नोंदी ठेवण्याची सवय असेल तर एखाद्या विषयाची व्याख्यानासाठी तयारी करताना त्याचा खूप फायदा होतो. ‘सर्वसारसंग्रह’ या नावाची अनेक पृष्ठांची स्वातंत्र्यवीर सावरकरांची टिपणवही पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. सावरकर म्हणत, ‘माझ्या वक्तृत्वाचा पाया या टिपणवहीने मजबूत केला आहे.’ वाचनातून मनाच्या गाभाऱ्यात काही विचार शिरले की त्यांना नवे धुमारे फुटू शकतात. म्हणून गंभीरपणाने वाचन केले पाहिजे.

वक्त्याच्या ठायी एखाद्या सुगरणीचे कौशल्य असणे आवश्यक आहे. सुगरणीजवळ स्वयंपाकघरात सर्व प्रकारची सामग्री आणि वस्तू उपलब्ध असतात; पण ‘स्वयंपाक’ ही तिचीच मिरासदारी असते. अनेकदा तो पदार्थ वर्षांनुवष्रे अस्तित्वात असल्यामुळे कृतीही माहीत असते, पण तिची कल्पकता आणि सर्जनशीलता यांतून रुचकर पदार्थ तयार होतो. हे कसब वक्त्याला साधता आले पाहिजे. आजवर केलेले वाचन, घडलेले श्रवण यांवर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे, विचारांचे काही संस्कार ज्याला करता येतात त्याचे वक्तृत्व इतरांपेक्षा वेगळे उठून दिसते. ही कला एका दिवसात आत्मसात करता येत नाही. स्वयंपाक हा जसा करता करता येतो, सराव करून खेळ जमतो, रियाज करून गाणे जमते, तालमी करून नाटक जमते तसेच वक्तृत्वाचे देखणे रूप साधनेतूनच आकाराला येते. वक्तृत्व ही केवळ शब्दांची आतषबाजी नसते, तर ती जीवनाची उपासना असते. ही उपासना निष्ठापूर्वक करणाऱ्यांनाच वाग्देवता प्रसन्न होते.

मनात एकदा विषयाचा आराखडा तयार झाला की, त्याचे ‘चिंतन’ केले पाहिजे. जशी पॉलिशमुळे सोन्याला झळाळी येते तसे चिंतनामुळे वक्तृत्व तेजस्वी होते. श्रवण आणि वाचन, मनन आणि चिंतन यांना एकांताचे कोंदण लाभले तर वक्त्याचे वक्तृत्व झळाळून निघते.

अनेक वक्त्यांना हातात मुद्दय़ांचे टिपण घेऊन बोलणे सोयीचे वाटते किंवा अपरिहार्यही असते; पण कागद किंवा टिपण हा वक्ता आणि श्रोता यांच्यातला मोठा अडसर ठरू शकतो. वक्ता टिपणात अडकून राहतो. श्रोत्यांच्याही वाटय़ाला एकाग्रता येत नाही. त्यामुळे जो टिपणाशिवाय संवाद साधतो, त्याचा अधिक प्रभाव पडतो. मनन आणि चिंतन प्रभावीपणे करता आले तर स्मरणात सर्व काही उत्तम राहू शकते. स्मरणशक्ती ही एखाद्या वेलीसारखी असते. सर्व घटक योग्य प्रमाणात मिळाले की जशी वेलीची वाढ होते, तसेच लेखन, वाचन, मनन आणि चिंतन मन:पूर्वक केले की स्मरणशक्तीची वेल गगनाला जाऊन भिडू शकते.

स्वामी विवेकानंदांना एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे सर्वच्या सर्व खंड मुखोद्गत होते. कोणताही संदर्भ कोणत्याही टिपणाशिवाय ते देऊ शकत होते. जशी आपण शरीरसंपदा कमावतो, तशीच स्मरणशक्तीही कमावता येऊ शकते. ज्या वक्त्यांपाशी स्मरणशक्ती असते त्यांचे वक्तृत्व अधिक नेटके, सुडौल आणि सुरस होते.

वक्ता ज्यावेळी बोलत असतो तेव्हा एकाच वेळी दोन क्रिया घडत असतात. स्वत:शी विचार करीत करीत तो बोलत असतो, त्याच वेळी तो श्रोत्यांशी संवाद साधत असतो. त्याच्या विचाराचा वेग आणि प्रतिपादनाचा वेग या दोन्ही वेगाला खूप महत्त्व आहे. वक्तृत्वात वेग आवश्यक आहे. कारण त्याशिवाय भाषण प्रभावी आणि प्रवाही होत नाही; पण प्रचंड वेगाने बोलणारे वक्ते स्वत:चे आणि श्रोत्यांचेही नुकसान करतात. धपधप पडणारा पाऊस जमिनीच्या पृष्ठभागावरून लगेच वाहून जातो; पण हळुवार येणाऱ्या पावसाच्या सरी जमिनीमध्ये खोलवर जातात आणि त्यावर पिकांचे चांगले भरणपोषण होते. हळुवार तरीही प्रवाही वक्तृत्व श्रोत्यांच्या अंत:करणाच्या तारा छेडू शकते.

वक्त्याच्या ठायी शब्दशक्ती, विचारशक्ती, स्मरणशक्ती याचबरोबर एक अवधानशक्ती असली पाहिजे. आपण कुठे बोलतो आहोत, श्रोत्यांची मानसिकता कशी आहे, समारंभाचा उद्देश काय आहे, याचे आकलन वक्त्याला व्यासपीठावर येताना आणि व्यासपीठावर बसल्यावर झाले पाहिजे. आपले तेच खरे असे मानणारे आणि श्रोत्यांवर प्रत्येक गोष्ट लादणारे वक्ते लवकर कालबाह्य़ होतात. प्रत्येक वक्त्याला स्वत:ची म्हणून शैली असावी लागते. कोता आवाज वक्तृत्वाचा प्रभाव पाडू शकत नाही. गायक आवाज कमावतात. त्यासाठी नानाविध प्रकारचे व्यायाम, प्राणायाम, ॐकाराचे उच्चारण करतात. आवाज कमावण्यासाठी हे सारे मार्ग वक्त्यानेही चोखाळले पाहिजेत.

वक्ता होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपकी एकही गुण नसलेला डेमॉस्थेनिस महान वक्ता झाला. त्याचे चरित्र प्रत्येक वक्त्याने अभ्यासले पाहिजे. त्याचा आवाज कोता, कमकुवत आणि कापरा होता. तो रोज धावण्याचा सराव करू लागला. टेकडय़ांवरून चढ-उतार करू लागला. त्याची श्वसनशक्ती मजलेदार झाली. पल्लेदार वाक्ये धाप न लागता त्याला पेलता येऊ लागली तरीही एक अडचण जाणवली. त्याचा आवाज पल्लेदार झाला; पण दमदार झाला नाही. त्याला वजन, विस्तार आणि व्याप्ती नव्हती. तो सागरतीरावर जाऊन मोठय़ाने बोलू लागला. लाटांनाच श्रोते मानून तो बोलत राहिला. त्याची वाणी खणखणीत झाली. गालावरचे, मुद्रेवरचे आणि जिभेचे स्नायू बळकट व्हावेत म्हणून काही काळ लोकभ्रमाच्या आहारी जाऊन तो तोंडात गारगोटय़ा धरून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यात थोडी गंमत आणि बराचसा वेडेपणा होता. आवाज तयार झाला. शब्दसामथ्र्य आणि भाषावैभव संपादन करण्यासाठी त्याने थुसिडिडिज या लेखकाचा इतिहासग्रंथ अनेकदा वाचला. काही वेळा तो अक्षरश: आणि विरामश: उतरवून काढला. त्याच्या ओठात आणि बोटात भाषा भिनली. एक जिव्हाजड माणूस महान वक्ता झाला. ग्रीस देशातल्या वक्तृत्व पंढरीचा पांडुरंग झाला.

वक्तृत्व आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. एक-दीड तास सलग बोलण्यासाठी अंगात मोठी रग असावी लागते. पल्लेदार वाक्ये उच्चारताना श्वास टिकवून ठेवावा लागतो. अनेकदा परगावी एक तासाचे व्याख्यान देण्यासाठी बारा-चौदा तासांचा प्रवास करावा लागतो. त्याचा शीण बाजूला ठेवून प्रसन्न मुद्रेने सभेला सामोरे जावे लागते.

व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज मोठी पीछेहाट होत असली तरी बोलण्याचे किंवा नेटक्या बोलण्याचे महत्त्व कदापिही कमी होणार नाही. उलट ते वाढतेच आहे. संवाद, मुलाखती, परिसंवाद, चर्चासत्रे, निवेदन अशा अनेक रूपात भरजरी थाटात ते वावरते आहे. उत्तम बोलता येणाऱ्याचे हे दिवस आहेत. गुजगोष्टी करण्यापासून कॉर्पोरेट जगतात उच्चरवात आपली भूमिका मांडण्यापर्यंत प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींशी बोलणे निगडित आहे.

बोलणे हा केवळ जगाच्या व्यवहारातील उपचाराचा भाग नाही. बोलण्यातून भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृती आणि पर्यायाने त्या समाजाचे उन्नयन होत असते. म्हणूनच वाचिक अभिव्यक्तीकडे गांभीर्याने पाहायला हवे.

वक्तृत्व

श्रोतृवर्गावर वाणीच्या (वक्तृत्वशैलीद्वारे) माध्यमाद्वारे प्रभाव पाडण्याची कला, भाषणाच्या माध्यमाने श्रोत्याला आकर्षितकरून आपल्या विचार-विकार-भावनांची श्रोत्यांवर छाप पाडून त्यांना आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य वक्तृत्वकलेत असते. वक्तृत्व हे एक शास्त्र (ऱ्हेटारिक्स) असून ती एक कलाही आहे. रिटोरिकी (Rhetorike) या ग्रीक शब्दावरून रिटोरिका (Rhetorica) हे लॅटिन रूप तयार झाले. त्यावरून ऱ्हेटारिक्स हे इंग्रजी रूप बनले. ‘ऱ्हे (रे) टारिक्स’ या मूळ इंग्रजी शब्दाचा वक्तृत्वशास्त्र हा मराठी प्रतिशब्द. रेटॉर (Rhetor) म्हणजे वक्ता आणि आयकॉस (Ikos) म्हणजे शब्द यांवरून ही संज्ञा बनली आहे.

वक्तृत्व ह्या संकल्पनेचा उगम ग्रीकांच्या वसाहतीत सिराक्यूझ येथे झाला; परंतु या संकल्पनेचा विकास आणि वृद्धी ग्रीक व रोमन संस्कृतीत प्रामुख्याने अथेन्स व रोम या नगरींत झाली. सिसिलीतील सिराक्यूझ या ग्रीक वसाहतीत इ. स. पू. ४६६ मध्ये लोकशाही शासनप्रकार कार्य़वाहीत आला, तेव्हा तेथील हद्दपारीतील जुन्या लोकांनी संपत्तीच्या संदर्भात जुलमी लोकांवर खटले भरले होते. परंतु त्यांच्याकडे लखित पुरावे फारसे नव्हते. त्यांना आपली बाजू प्रभावीपणे मांडणारे वाक्पटू हवे होते. अशा वेळी सिसिलियन ग्रीक कोरॅक (Korax) पुढे आला व त्याने आपल्या वाक्चातुर्याने हे खटले चालविले. तोच वक्तृत्वकलेचा प्रणेता वा संस्थापक मानण्यात येतो. त्याने टिसिअस या शिष्याच्या मदतीने पुढे सार्वजनिक ठिकाणी व्याख्यान देण्यासंबंधी एक नियमावली बनविली व भाषणाचे मुद्दे कसे संकलित करावेत, ह्याचे तीत पद्धतीशीर विवेचन केले. त्याच्या मते, प्रास्ताविक, संगतवार कथन, अंगभूत टीका, मुद्देसूद सारांश आणि संक्षिप्त आढावा या पाच भागांचा कोणत्याही व्याख्यानात समावेश असावा.

सिराक्यूझमधून ही वक्तृत्वकला अथेन्मध्ये प्रसृत झाली आणि तेथील लोकशाहीला अधिक स्फुरण मिळाले व ती उत्तरोत्तर विकसित झाली, प्राचीन ग्रीक संस्कृतीत अथेन्समधील बहुतेक सर्व पुरुष नागरिक सार्वजनिक सभेतील धोरणात्मक कार्यात व न्यायदानाच्या प्रशासनात सहभागी होत असत. न्यायालयात त्यांपैकी काही पंच म्हणूनही हजर असत. अशा प्रकारे बचावात्मक भाषणे होऊ लागली आणि वक्तृत्वकलेस आपापतः प्रोत्साहन मिळाले. तत्कालीन शिक्षणक्रमातही या कलेचा समावेश झाला. प्रोटॅगरस, गॉर्जीअस, हिपीअस इ. सॉफिस्ट शिक्षकांनी चर्चासत्राची तत्त्वे, वकृत्त्वाची शैली, स्मरणशक्ती व अस्खलितपणा या मुद्यांचे विवरण केले. त्यामुळे वक्तृत्वकलेचे रीतसर अध्यापन सुरू झाले. वक्तृत्वकला ही एक ललितकला म्हणून इ. स. पू. पाचव्या–चवथ्या शतकांत विकसित झाली. पेरिक्लीझ (इ. स. पू. ४९५–४२९) आणि डिमॉस्थिनीझ इ. स. पू. ३८४–३२२) हे दोन अथेनियन अभिजात ग्रीक वक्ते. थ्यूसिडिडीझ याने आपल्या हिस्टरी ऑफ द पेलोपनीशियन वॉर या ग्रंथात पेरिक्लीझचे ‘फ्यूनरल ओरेशन’ हे प्रसिद्ध भाषण उद्धृत केले आहे. डिमॉस्थिनीझ त्यांच्या राष्ट्रभक्तिपर भाषणांसाठी प्रसिध्द होता. वक्तृत्वावरीलप्रमुख ग्रीक लेखकांत ॲरिस्टॉटलची गणना केली जाते. त्याने रेटारिक या ग्रंथात उत्तम वकृत्त्वासाठी इथिकल (नीतिपर), पॅथेटिक (करुणरसोत्पादक) व लॉजिकल (तार्किक) या तीन गोष्टी प्रतिपादिल्या. रोमनांनी अनेक बाबतींत ग्रीकांचेच अनुकरण केले आहे. त्यांनी ही कला वृद्धिंगत केली, जोपासली आणि तिच्या संवर्धनासाठी एक तत्त्वप्रणाली तयार केली. केटो व सिसरो (इ. स. पू. १०६–४३) हे थोर वक्ते व वक्तृत्वशास्त्रावरील विचारवंत–लेखक होत. सिसरोने रेटोरिका अँड हेरे नियम हा ग्रंथ इ. स. पू. ८६ मध्ये लिहिला. त्यात भाषणाच्या प्रमुख पाच पायऱ्या सांगितल्या आहेत : (१) नवी कल्पना (भाषणाच्या परिस्थितीचे विश्लषण व श्रोतृवर्ग – तसेच भाषणाचा अभ्यास–आणि त्यारिता लागणारे साहित्य यांची जुळवाजुळव), (२) आविष्कारमांडणी–(प्रास्ताविकाची मांडणी,मुद्यांची चर्चा आणि अनुमान), (३) शैली–(भाषेची, विशेषतः वाक्यरचना, वाक्प्रचार यांद्वारे बिनचूक माहिती आणि असंदिग्ध विचारांची मांडणी), (४) स्मरणशक्ती–(तपशिलांचे पाठांतर अस्खलितपणे निवेदन करणे), (५) व्याख्यानाची पद्धत–(वाक्चातुर्य–सुस्पष्ट शब्दांची मांडणी). द ओरेटर या ग्रंथात सिसरोने वक्ता हा विद्वान, व्यासंगी, भाषेवर प्रभुत्व असलेला (भाषाप्रभू) आणि श्रोतृवर्गाची भावना व नस जाणणारा असावा, असे जाणीवपूर्वक प्रतिपादिले आहे. वरील सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण त्याने या पुस्तकाच्या विविध भागांत दिले आहे. सिसरोनंतरचा या विषयावरील थोर लेखक व शिक्षक म्हणजे मार्कस फेबिअस क्विंटिल्यन (इ. स. ३५–१००) हा असून त्याने इन्स्टिट्यूशिओ ओरेटिरिया (इ. स. ९०) या ग्रंथात वक्तृत्वशास्त्राच्या अध्यापनाविषयी तसेच वक्त्यांच्या शिक्षणाविषयी बहुमोल चर्चा केली आहे. वर्तमानकाळातसुद्धा चांगले वक्ते तयार करण्यास हा बहुव्यापक असा ग्रंथ आहे. रोमन नगरांतील विद्यालयांतून हा विषय त्यावेळी शिकविला जात असे. ग्रेको–रोमन संस्कृतिकाळापासून वक्तृत्वकला दिवसेंदिवस विकसित होत गेली आणि काही काळ तिचा तत्कालीन अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा विषय म्हणून समावेशही करण्यात आला. यावर विविध तत्त्वज्ञ–लेखकांनी लेखन केले आणि वक्तृत्वकलेची काही तात्विक सूत्रे व तत्त्वे संगृहित केली. त्यानुसार पुढे वक्तृत्वकला जोपासली जाऊ लागली. मध्ययुगात चर्चचे वर्चस्व वाढले, वक्तृत्वकलेत काही फेरफार झाले आणि राजकीय विषयांऐवजी धर्मप्रचारासाठी तिचा वापर होऊ लागला. तरी वक्तृत्वशास्त्रातील नियम आणि तत्वप्रणाली तीच राहिली. भाषणापासून श्रोत्यांना प्रेरणा, आनंद व मानसिक प्रसन्नता लाभावी, अशी खबरदारी वक्त्याने घ्यावी. मध्य व समारोप यांचा सांगोपांग विचार करून नेमके विचार मांडणे आणि सांगणे हे लेखन–वाचन–व्यासंग यांनी साधते. कल्पकतेला वाव मिळतो, भावना प्रभावीपणे व्यक्त करता येते आणि मुख्यतः वक्त्याचा आत्मविश्वास वाढतो; यांवर भर देण्यात आला. भाषणाची सुरवात ही श्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, मध्य त्याच्या गाभ्यात प्रवेश करण्यासाठी, तर समारोप आपल्या विचारांचा श्रोतृमनावर चिरस्थायी ठसा बिंबविण्यासाठी उपयोगी पडतो. भाषाशैली, नाट्यपूर्ण हावभाव, आवाजातील आरोह-अवरोह, मुद्देसुद मांडणी व टिपणांचा चपखल वापर इत्यादींमुळे व्याख्यान प्रभावी ठरते. धर्मसुधारणा आंदोलन (इ. स. १५००–१६००) व प्रबोधनकाल (इ. स. १४००–१६००) या कालखंडांत यूरोपचे धार्मिक, राजकीय व वैचारिक जीवन ढवळून निघाले. चर्चच्या एकछत्री वर्चस्वाला विरोध करणाऱ्या शक्ती मध्ययुगाच्या अखेरीस उदयास आल्या. राजकीय वक्त्यांची जागा धर्मोपदेशकांनी घेतली. मार्टिन ल्युथर व जॉन कॅल्व्हिन या आध्वर्यूंनी आपल्या वक्तृत्वातून प्रभावीपणे मांडलेले धर्मसुधारणेचे मूलभूत सिद्धांत लोकप्रिय झाले आणि आध्यात्मिक क्षेत्रात सर्व ख्रिस्ती समान आहेत आणि प्रॉटेस्टंट नीतीमुळे सर्व क्षेत्रांत, विशेषतः आर्थिक व राजकीय, चैतन्य आणि गतिशीलता उफाळून आली. याच संदर्भात जॉन नॉक्स, ऑगस्टीन इत्यादींचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. जॉन नॉक्सने आपल्या वक्तृत्वशैलीने प्रेसविटरियन चर्चचा प्रसार-प्रचार केला. अठराव्या शतकातील जॉन वेस्ली व जॉर्ज व्हाइटफील्ड यांनी मेथडिस्ट संप्रदायाच्या तत्त्वांचा अत्यंत कौशल्याने प्रचार-प्रसार केला. या काळात वक्तृत्वकलेचा व्याकरण आणि न्याय या उदात्त कलांबरोबर पदवीपूर्व शिक्षणक्रमात समावेश करण्यात आला. प्राचीन रोमन आणि ग्रीक लेखकांनी या विषयावर लिहिलेली पुस्तके पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासाला लावण्यात आली. यांशिवाय लिअनार्ड कॉक्सचे द आर्ट ऑर क्राफ्ट ऑफऱ्हेटोरिक (१५२४) आणि टॉमस विल्सनचे द आर्ट ऑफ ऱ्हेटोरिक (१५५३) हे तत्कालीन लेखकांचे या विषयावरील ग्रंथही महत्त्वपूर्ण ठरले. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध (१७७४–८३) आणि फ्रेंच राज्यक्रांती (१७८९) यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तत्त्वत्रयीचा प्रसार होऊन लोकशाही झपाट्याने विकसित झाली. इंग्लंडमध्ये या सुमारास राजेशाहीवर मर्यादा पडून संसदीय लेकशाही प्रगल्भावस्थेकडे वाटचाल करीत होता. विल्यम पिट, एडमंड वर्क, चार्ल्स फॉक्स (इंग्लंड); आलिग्येअरी दान्ते, ओनॉरे मीरावो, रोब्झपीअर (फ्रान्स); पॅट्रिक हेन्री, जोनथन एडवर्ड्स (अमेरिका) हे काही तत्कालीन प्रसिद्ध राजकीय वक्ते संसदेतील आपल्या प्रभावी भाषणांमुळे संसदपटू म्हणून प्रसिद्धी पावले आणि लोकमानसात त्यांना मान व प्रतिष्ठा लाभली. याच काळातील मायकेल फॅराडे हा प्रभावी वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध असलेला इंग्लिश भौतिकीविज्ञ आणि संशोधक. त्याने वक्तृत्वकलेविषयी व्यक्त केलेले विचार उद्बोधक आहेत. तो म्हणतो "वत्त्याने आपले सर्व कौशल्य पणाला लावून श्रोतूवर्गाचे मन आणि बुद्धी संपूर्णपणे आपल्याकडेच वेधून राहील, अशा पद्धतीने सर्व विचार व कल्पना मांडाव्यात. श्रोत्यांची उत्सुकता टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि उत्स्फूर्त होईल, अशा पद्धतीने विषयाची रचना करावी. वक्ता निर्भय, मनमोकळा, एकाग्रचित्त आणि ठामपणे विषय मांडणारा असावा. त्याचे विचार स्पष्ट व निःसंदिग्ध आणि त्याचे ज्ञान निश्चित असावे." वक्तृत्वकला विद्यापीठीय अभ्यासक्रमातून वगळली गेली; तथापि पश्चिमी देशांत वक्तृत्व शिकविणाऱ्या खाजगी संस्था उदयाला आल्या आणि विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्रे आणि पदव्याही त्यांच्याकडून देण्यात येऊ लागल्या.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत राजकीय नेते आणि समाजसुधारक यांनी आपल्या ओघवती शैलीने जनमानसाला मंत्रमुग्ध केलेली अनेक भाषणे प्रसिद्ध असून त्यांपैकी चार्ल्स समनरचे द क्राइम अगेन्स्ट कॅन्सस (१८५०), अब्राहम लिंकनचे गेटीझबर्ग येथील गुलामांच्या मुक्तीविषयीचे व लोकशाहीची व्याख्या विशद करणारे (१९ नोव्हेंबर १८६३) किंवा दुसऱ्या महायुद्धातील विन्स्टन चर्चिल यांचे मायभूमीच्या स्वातंत्र्याविषयीचे तडफदार वक्तव्य (१९४२), वेनीतो मुसोलिनी व अँडॉल्फ हिटलर यांची त्यावेळची देशवासियांना युद्धाला उद्युक्त करणारी भडक शैलीतील वक्तव्ये आणि युद्धोत्तर काळातील वुड्रो विल्सन, वेंडेल विल्की, जॉन एफ्. केनेडी यांची देशवासियांना अधुनिक प्रवाहात स्वकर्तुत्वावर सामील होण्यासाठी केलेली भाषणे इतिहासात प्रसिद्ध आहेत. काळ्यांना नागरी हक्क प्राप्त झालेच पाहिजेत, याचा हिरिरीने पुरस्कार करणाऱ्या मार्टिन ल्युथर किंगचे १९६३ मधील ‘ आय हॅव ए ड्रीम...’हे वॉशिंग्टन डी. सी. मधील भाषण पुढे जगद्विख्यात झाले.

भारतात प्रवचन, गोंधळ, कीर्तन, पुराण इ. जुन्या परंपरागत संस्थांत वक्तृत्त्वाचा आविष्कार काही प्रमाणात होत असला, तरी नव्या काळाची गरज या संस्था पुरवू शकत नाहीत, हे अनुभवांती लक्षात आले. प्रामुख्याने टिळकयुगात गणेसोत्सव व शिवजयंती उत्सव आणि म. गांधीच्या काळात स्वदेशी चळवळी-असहकारितेचा प्रसार, सत्याग्रह यांसाठी झालेल्या प्रचार सभांतून विसाव्या शतकात बहुसंख्य वक्ते निर्माण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेत वक्तृत्वावर एक निबंध लिहून वक्तृत्वकलेची साक्षेपी चर्चा केली आहे. लाल (लजपत राय), पाल (बिपिनचंद्र) व बाल (टिळक) यांनी आपल्या जहाल वक्तृत्वशैलीने ब्रिटिशांबद्दलचा विरोध वाढीस लावला आणि स्वदेशीचा प्रसार-प्रचार केला. स्वामी विवेकानंद, एम्. आर्. जयकर, श्रीनिवासशास्त्री इ. वक्त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातआपल्या ओघवती शैलीने श्रोत्यांची मने जिंकली. शि. म. परांजपे यांनी आपल्या वकृत्त्वात वक्रोक्तीचा उत्तम वापर करून ब्रिटिश शासनावर टीकेची झोड उठविली. राम मनोहर लोहिया, नाथ पै, बाळासाबेह खर्डेकर, अटलबिहारी वाजपेयी हे थोर संसदपटू म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांच्या वक्तव्यात शासनावरील टीकेबरोबरच मर्म विनोद, काव्य आणि कोट्या आढळतात. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राने बाळशास्त्री हरदास, गोळवलकर गुरुजी, प्र. के. अत्रे, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले, बाळासाहेब ठाकरे इ. अनेक नामवंत वक्ते दिले. ठिकठिकाणच्या वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा व शाळा-महाविद्यालयांतील वक्तृत्वृ-स्पर्धा यामधून अनेक चांगले वक्ते निर्माण झाले आहेत.

लोकशाहीत वक्तृत्वाला नियतकालिक निवडणुकांमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ध्वनिक्षेपकाच्या शोधामुळे लाखो श्रोत्यांना वक्तृत्वाचा लाभ घेता येतो. प्रचारसभांतून वक्तृत्वाची कसोटी लागते. राज्ययंत्रणा चालविण्यासाठी व ती उलथून टाकण्यासाठी वकृत्त्व हे एक फार मोठे प्रभावी हत्यार वापरले जाते. संस्था, मंडळे, कंपन्या, समित्या, महामंडळे, परिषदा इत्यादींमध्ये निवडणुकांची पद्धती असून तेथे वक्तृत्वाचा उपयोग होतो. वक्तृत्व हे शिक्षक, विमा एजंट, दुकानदार, विक्रेते, वकील इ. व्यावसायिकांना अत्यावश्यक असते. मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवाराला वक्तृत्त्व आणि संभाषणकला अवगत असेल, तर त्याची तात्काळ छाप पडते.

विद्यमान तांत्रिक युगात वक्तृत्व ही संज्ञा हळूहळू अप्रतिष्ठा पावत असून तिचा वारंवार गैरवापर आढळतो. बार्नेट बास्करव्हिल द पीपल्स व्हॉइस (१९७९) या ग्रंथात म्हणतात, ‘लोकांची रुची बदलली असून त्यांना दोन तासांऐवजी वीस मिनिटांचे वक्तव्य अधिक रुचते. आता वक्ता हा मंत्रमुग्ध करणारा लोकनेता उरला नाही.’ आकाशवाणी व दूरदर्शन या प्रसार-माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वक्तृत्वातील शब्दावडंबर आणि प्रगल्भता यांवर स्वाभाविक बंधने आली असून ते अधिकाधिक संभाषणात्मक, अनौपचारिक, त्रोटक व चपखल शब्दांत बसविले जाते आणि लोकांनाही त्याची आता सवय झाली आहे.

संदर्भ: 1. Baskerville, Barnet, The People's Voice, Lexington, 1979.

2. Oliver, Robert T. History of Public Speaking in America, Greenwood, 1978.

3. Thonssen, Lester; Baird, A. C. Barden, Waldo W. Speech Criticism, Krieger (N. Y.), 1981.

४. गडकरी, माधव,सभेत कसे बोलावे ? मुंबई, १९८४.

५. गाडगीळ, न. वि. वक्तृत्वशास्त्र कला-तंत्र-मंत्र पुणे, १९५८.

लेखक: सु. र. देशपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

श्रेष्ठ वक्ता बनण्यासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणवत्ता असावी लागते. या गुणांपैकी काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते. तर काही गुण त्याला प्रयत्न करुन प्राप्त करावे लागतात, विकसित करावे लागतात.

वक्त्याजवळ कोणते गुण असावेत ते पुढील प्रमाणे-

  1. वाचन :- चांगला वक्ता होण्यासाठी चांगले आणि सतत वाचत राहिले पाहिजे, जो वाचेल तो वाचेल. समर्थ रामदास स्वामी सांगतात "प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।। काही लोक वाचन करताना पानोपान वाचण्याची सवय असते पण त्यांना थोड्या वेळाने विचारले तर त्यांना काही सांगता येत नाही . वाचन करताना त्याचे वाचनामध्ये मन नसते . त्याचे लक्ष नसते. अशा प्रकारचे वाचन वक्त्याला उपयोगी नसते .

  2. लेखन :- श्रेष्ठ वाक्त्याजवळ आवश्यक असणारा हा दुसरा गुण म्हणजे लेखन होय. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे। आपण जे वाचतो त्यातले महत्वाचे मुद्दे संपूर्ण संदर्भासह लिहून ठेवावे. म्हणजे आपल्या भाषणाची तयारी करताना आपण जे मुद्दे टाचनवहीमध्ये नोंदवून ठेवले आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. वक्त्याने दररोज काही तरी लिहिण्यासाठी सवय ठेवावी.

  3. हजरजबाबीपणा :- वक्त्याजवळ आवश्यक असणारा तिसरा महत्वाचा गुण म्हणजे हजरजबाबीपणा होय. वक्ता बोलत असताना काही वाचाळ श्रोत्यांना वक्त्यांच्या भाषणामध्ये मधेच शेरेबाजी करण्याची सवय असते. अशावेळी ती शेरेबाजी विनोद निर्माण करणारी असेल तर सर्व श्रोते शेरेबाजीवर मोठा हास्य निर्माण करतत. अशावेळी वक्त्याची मोठी गडबड उडून जते. पण जर वक्ता हजरजबाबी असेल तर तो त्या शेरेबाजीवर योग्य ती मत करू शकतो. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना हसौयाची संधी मिळू शकते. आणि शेरेबाजी करणार श्रोता गप्प बसतो. मग यापुढे त्या वक्त्याच्या भाषणामध्ये श्रोते शेरेबाजी करण्यापूर्वी १० वेळा विचार करतात.

  4. आत्मविश्वास :- श्रोत्यांसमोर उभे राहताना वक्त्याजवळ प्रचंड आत्मविश्वास असायला हवा. बऱ्याच जणांना आपल्या समोर कोण बसलेले आहेत म्हणजे भीती वाटू लागते, बोबडीच वळते. आणि मग तत पप करू लागतात. असे झाल्यावर श्रोते वक्त्याची खिल्ली उडवतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे हि अशी अवस्था होते.

  5. निर्भयता :- वक्त्याजवळ आवश्यक असणारा पाचवा महत्वाचा गुण म्हणजे निर्भयता हा होय. वक्ता हा वृत्तीने निर्भय असला पाहिजे. इतरांची मते खोडून काढणारा किंवा आपली मते मांडताना वक्त्याने आपला मुद्दा अत्यंत निर्भयपणे आणि ठामपणे मांडला पाहिजे. विशेषतः वादविवादाच्या कार्यक्रमात, स्पर्धात्मक भाषणात जेव्हा श्रोत्यांना आपली मते ठासून सांगायचे असते. त्यावेळी निर्भयतेची आवश्यकता लाभते त्याचबरोबर सभेमध्ये उपस्थित असलेल्या श्रोत्यांकडे पाहताना, शेरेबाजीला सामोरे जाताना अशा प्रकारची निर्भयता खूपच महत्वाची ठरते.

  6. व्यासंग :- वक्त्याजवळ आवश्यक असणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे व्यासंग होय. हा व्यासंग अनेक बाबतीत आवश्यक आहे. वाचन, लेखनाचा व्यासंग असणे हे चांगल्या वक्त्याला आवश्यक आहे. भाषणे, कीर्तने, प्रवचने ऐकण्याचा, त्यातले बारकावे जाणून घेण्याचा, त्याची लकब अभ्यासण्याचा, त्याच्या शैलीचा विचार करण्याचा व्यासंग वक्त्याला हवा.

  7. मुत्सद्दीपणा :- वरवर पाहता असे वाटते कि मुत्सद्दीपणा या गुणाची प्रामुख्याने राजकारणी लोक आणि वकिलीचा व्यवसाय करणाऱ्यांनाच गरज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नसते. ज्यावेळी एकाच विषयावर, एकाच विषयाला धरून आकापेषा जास्त वक्ते विषय मांडणार असतात त्यावेळी किंवा वादविवाद स्पर्धेच्या वेळी अशा प्रकारच्या मुत्सद्दीपणाची नितांत गरज असते.

  8. विनोदबुद्धी :- समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'टवाळा आवडे विनोद ।' असे असले तरी वक्त्याजवळ विनोदबुद्धी असावी लागते. दुसऱ्याने केलेले विनोद ज्याप्रमाणे आपल्याला कळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्या विनोदाला योग्य ती दाद दिली गेली पाहिजे हि कला देखील आपल्याला जमायला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यासंगाची गरज आहे त्याचप्रमाणे विनोदबुद्धीची हि गरज आहे.

  9. श्रोत्यांची परीक्षा घेण्याचे कसब :- वक्त्याजवळ श्रोत्यांना समजून घेण्याचे त्याची त्याच्याही नकळत परीक्षा घेण्याचे कसब असावे लागते. वक्त्याला श्रोत्यांची नाडी ओळखता आली पाहिजे. मग वक्ता आपल्या विषयाची योग्य पद्धतीने मांडणी करून मग आपल्या विषयाचा योग्य विचार करू शकतो. त्यासाठी सर्वसाधारण सभेत बसल्यानंतर कोणत्या प्रकारचे श्रोते आले आहे हे पहिले वक्त्याने ओळखले पाहजे. उदा. श्रोत्यांमध्ये शिकलेले किती ? अशिक्षित लोक किती ? स्त्रिया किती ? पुरुष किती ? वृद्ध किती ? तरुण किती विनोद किती जणांना आवडतो किंवा नाही ? त्याच्या समोर कसे भाषन केले तर आपल्या भाषणाला कशी दाद मिळेल ? अशा विविध प्रश्नाची उत्तरे त्याची त्यानेच मिळविण्याची कसब वक्त्याजवळ असावे लागते.

  10. विषयाचे ज्ञान :- वक्त्यासाठी, वकृत्वासाठी आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे विषयज्ञान होय. शरीरामध्ये ज्या प्रमाणे प्राण महत्त्वाचा त्याचप्रमाणे वक्त्याला आवश्यक असणारा हा गुण होय. ज्या विषयावर आपल्याला बोलायचे आहे त्याचे यथोचित ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे त्या विषयाचे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. पुस्तक वाचणे, चिंतन, मनन करणे, अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विषयाचा विचार करताना वक्त्याने प्रथम आपला विषय कोणता आहे ते नित समजून घेणे आवश्यक आहे.

  11. विषय विवरणाची सवय :- आपल्या व्याख्यानाचा विषय स्पष्ट करीत असताना वक्त्याने क्रमाने आपल्या विषयातील मुद्द्याचे विवरण करण्याची सवय आत्मसात करायला हवी. विषय प्रवेश, विषयाची स्पष्टीकरण, त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भ, विषय परिपूर्ण करणारे मुद्दे आणि अखेरीस स्वमत प्रदर्शन करून त्या विषयाचा योग्यरित्या चिरफाड करता आली पाहिजे म्हणजे श्रोत्यांच्या अनेक शंकांना नकळतच उत्तर मिळते.

  12. विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची सवय :- विषय विवरणाची सवय वक्त्याला त्यावेळीच लागते ज्यावेळी आपण विशिष्ट पद्धतीने विचार करू शकतो.वक्त्याने नेहमी सकारात्मक भाषेत बोलले पाहिजे आणि नकारात्मक भाषेत बोलणे टाळले पाहिजे. अर्थात नकारात्मक बोलणे हे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. वक्ता जर सकारात्मक विचाराचा असेल जीवनाकडे सकारात्मक दुष्टीने पाहणारा असेल तर स्वाभाविकच त्याचे बोलनेसुद्धा सकारात्मक होते त्याचा परिणामहि चांगला होतो

  13. भाषणातील गतीचे नियंत्रण :- वक्ता बोलत असताना त्याच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द हे विशिष्ट गतीने बाहेर पडत असतात. उदा . अटल बिहारी वाजपेयी बोलत असताना त्यांच्या दोन शब्दांमध्ये , वाक्यामध्ये भरपूर वेळ असतो .त्यामुळे त्यांचे भाषण अत्यंत शांततेने होते. याउलट शिवाजीराव भोसले ज्यावेळी विषय मांडत असतात त्यावेळी त्यांच्या दोन वाक्यांमध्ये ऐकणाऱ्याला जरा सुद्धा उसंत मिळत नसे. पहिले वाक्य संपले कि लगेचच दुसरे वाक्य उच्चारले जायचे .

  14. भाषाशैली :- भाषाशैलीचा विचार करताना वक्त्याने आपल्या समोर सुशिक्षित प्रकारचे बसले आहेत ,याचा विचार करणे आवश्यक आहे. सुशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित लोकांसमोर विषय मांडताना आपली भाषा देखील त्याच प्रकारची म्हणजे अश्या श्रोत्यांना आनंद देणारी असली पाहिजे . श्रोत्यांना दिले जाणारे संदर्भ हे मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यातील घटकांचे विचारांचे असले पाहिजे .लोकांना इंग्रजी , संस्कृत भाषेतील संदर्भ देणे आवश्यक ठरेल .

  15. आवाज :- वक्त्याचा आवाज हि त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे पूर्वी ज्या वेळी ध्वनिक्षेपाकासारखी साधने नव्हती तेव्हा वक्त्याचा आवाज दणदणीत असावा अशी अपेक्षा असायची .वक्त्याने आपले भाषण राणाभीमदेवी थाटात करावे, गर्जना करून करावे असे आचार्य अत्रे म्हणत असत .अश्या वेळी आवाज कमविण्यासाठी विशिष्ट मेहनत घ्यावी लागत असे . आचार्य अत्रे म्हणतात त्यांनी हा आवाज कमविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. उघड्या माळरानावर जावून दोन्ही गाळात दोन गोट्या किंवा सागर गोटे ठेवून मोठ्याने ओरडून बोलण्याचा सराव अत्रे करीत असतं त्यामुळे त्यांचा आवाज दणदणीत झाला होता . त्यामुळे माईक नसला तर पाच - दहा हजार लोकांना सहज आवाज ऐकायला जात होता.

  16. अभिनय :- श्रोत्याला आकर्षित करून घेण्यासाठी, त्याचे मनोरंजन करण्यासाठी वाक्त्याजवळ आवश्यक असणारा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे त्याचा अभिनय . त्याचे अभिनय कौशल्य ,वक्तृत्व हा एक प्रकारे एकपात्री नाट्य प्रयोग आहे . अश्या वेळी भाषणातील आशयाला धरून अभिनय केल्यास त्याच्या भाषणाची लज्जत खूपच वाढते . आपल्या चेहर्याचा योग्य तो वापर वक्त्याने करून घ्यायला हवा . डोळे लहान मोठे करून , चेहऱ्यावरील रेषा लहान मोठ्या करून ,वक्ता श्रोत्यांशी संवाद साधू शकतो, डोळ्यांची भाषा समोरच्या माणसाला पटकन समजते .

  17. उच्चार :- वक्त्याचे शब्दोच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत. उच्चारला जाणारा शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चारला गेला म्हणजे श्रोत्यांना तो नित कळतो. अन्यथा त्यातून महाभारत घडते.

अशा रीतीने प्रत्येक वक्त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे वक्त्यासाठी आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल याचा विचार करावा. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे', हे ध्यानात ठेऊन प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करावा. भाषण हि कला असून ती कष्टसाध्य आहे.हे ध्यानात घेऊन या क्षेत्रात ज्याला नाव कमवायचे आहे अशा वक्त्याने हि कला आत्मसात करण्यासाठी या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करून ही कला आत्मसात करावी .

आम्हा घरी धन | शब्दांचीच रत्ने | शब्दांचीच शस्त्रे | यत्न करू ||शब्दची आमुच्या | जिवाचे जीवनं | शब्दे वाटू धन | जनलोका ||
हे सारस्वताचे गोड | तुम्ही लाविले जी झाड |तरी आता अवधानामृते वाड | सिंपोनि किजे ||धन्यवाद!!!

संवाद अंतरीचा...!!!

संवाद ही मानवाची आदिम भूक राहिलेली आहे. आणि हाच संवाद वक्तृत्व पूर्ण करते. आज महाराष्ट्रात वक्त्यांना , स्पर्धांना, आणि मानधनाला कमी नाही, पण हरवत काय आहे तर ते वक्तृत्व !!!

डोईवर टोप आणि पायात पैंजणे घालून कोणत्याही बाजारबसवीला सरस्वतीचे रूप देता येत नाही , अगदी त्याच पद्धतीने शब्दांचा टोप आणि कवितेची पैंजणे बसवून असंबद्ध बोलण्याला वक्तृत्व म्हणता येत नाही .

ही एक आंतरिक गोष्ट आहे. विचारांचे घोडे बुद्धीचे मैदान धावून भुसभूशीत करायला लागले की त्याच मैदानात विचारांचे रोप उगवत असते ... हीच रोपे उगवावीत यासाठीचाच हा अट्टाहास ...

जगातील कितीही मोठा कलाकार असो, त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यास त्याला याच वक्तृत्वाच्या आधारे आयुष्याचे संचित सांगावे लागते .... हाच वक्तृत्वाचा विजय ....

विकार पुरून विचारांचे वटवृक्ष उभे राहावे आणि संस्कारांच्या सावलीत येणाऱ्या अनेक पिढ्या सुस्कारा टाकाव्या , हाच या प्रपंचाचा हेतू......

बाकी काय , बोलिले लेकुरे, वेडेवाकुडे उत्तरे , करा क्षमा अपराध , महाराज तुम्ही सिद्ध ......

वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा समिती कामाची माहिती

वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धा प्रकार म्हणजे वाद विवा. या जगात वादाची परंपरा फार फार जुनी आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्येही ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’आपण बघितले असतील. विकिपीडियावर ‘डिबेट’ या पानावर वादाच्या तब्बल 18 अधिकृत प्रकारांची माहिती दिली आहे. (घराघरात होणारे वाद वेगळेच! पण तो आपल्या चर्चेचा विषय नाही. कारण तिथे हार-जीत नसते. आपला इंटरेस्ट स्पर्धात्मक वादापुरताच आहे.) शालेयपेक्षाही मुख्यत: महाविद्यालयीन गटामध्ये वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात. (शाळेपासून जाहीर वाद घालायला लावण्याचे दिवस अजून यायचे आहेत!)


वक्तृत्वामध्ये जसे चार-पाच विषय असतात, तसे वाद स्पर्धेमध्ये एकच प्रस्ताव असतो. महाराष्‍ट्रामध्ये महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केल्या जाणा-या जवळपास सर्व स्पर्धा या ‘वन बाय वन डिबेट’ प्रकारच्या असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक महाविद्यालयातर्फे दोन स्पर्धकांचा संघ सहभागी होतो.

एक स्पर्धक विषयाच्या बाजूने (अनुकूल) आणि दुसरा विषयाच्या विरुद्ध बाजूने (प्रतिकूल) भाषण करतो. आलटून पालटून दोन्ही बाजूंचे स्पर्धकांचे भाषण झाल्यावर प्रस्तावाबद्दलच्या कुठल्याही निष्कर्षाशिवाय निकाल जाहीर होतो. ज्या महाविद्यालयाच्या दोन्ही स्पर्धकांची वैयक्तिक गुणसंख्या सर्वाधिक असते, त्या महाविद्यालयाला सांघिक चषक व ज्या स्पर्धकाची गुणसंख्या सर्वाधिक त्याला वैयक्तिक पारितोषिक मिळते. याचाच अर्थ, वाद स्पर्धेमध्येही व्यक्तिगत वक्तृत्व-वादकौशल्यालाच महत्त्व आहे. काही अपवादात्मक स्पर्धांमध्ये भाषणानंतर स्पर्धकाला परीक्षकांतर्फे किंवा श्रोत्यांतर्फे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे हीसुद्धा गुणदान करताना विचारात घेतली जातात.

वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू कशी वरचढ आणि बरोबर आहे हे दहा मिनिटांत परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते. चला, उदाहरण बघू!

प्रस्ताव - भारतीय कुटुंब पद्धती -हास पावत आहे.

हे वाचल्या वाचल्या तुमच्या डोक्यात एक तर ‘हो’ किंवा ‘नाही’ ही उत्तरे आली असतील. (ज्यांना ठरवता आलं नाही, त्यांना विशेष तयारीची गरज आहे.) आता आपण ‘हो’ म्हणजे प्रस्तावाच्या अनुकूल बाजूच्या मुद्द्यांचा विचार करू. अशी कल्पना करा, की भारतीय कुटुंब पद्धती -हास पावत आहे असं तुम्हाला मनापासून वाटतंय. आता हे परीक्षकांना असं पटवून द्यायचं की त्यानंतर प्रस्तावाला विरुद्ध बाजू असूच शकत नाही अशी त्यांची खात्री झाली पाहिजे!

तुमच्या मनात अनुकूल बाजूचे काय काय मुद्दे येत आहेत? (आता आपण मुद्द्यांवरच भर देणार. पूर्ण भाषण लिहिण्यात शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जाईल ना?)


1. भारतीय कुटुंब पद्धती म्हणजे काय?

2. या पद्धतीचा इतिहास, वर्तमान. भारतीय कुटुंब संस्थेशी संबंधित घटक - समाज, प्रथा, विवाह संस्था, अपत्यजन्म, वंशकल्पना, कुटुंबातील सदस्यांची देखभाल, नातीगोती, प्रेम-जिव्हाळा, सामाजिक बांधिलकी, सरकारी धोरणे.

3. भारतीय कुटुंब संस्थेचे फायदे


या कुटुंब संस्थेचा -हास होण्यामागचे घटक

1. बदलत्या काळानुसार बदललेला भारतीय समाज

2. जागतिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानामुळे कुटुंब संस्थेला पोचणारे धक्के. लोकसंख्यावाढीमुळे व वाढत्या महागाईमुळे ‘हम दो हमारा एक’ किंवा ‘सिर्फ हम दो’ ची नवीन पद्धत (सिलिंडर दरवाढीनंतर एकत्र कुटुंबाऐवजी दोन कुटुंबे वेगळी झाली तर दोन सिलिंडर मिळू शकतील अशी शक्यता सध्या दिसते आहे)

3. प्रदूषण, व्यसने, गतिमान जीवनपद्धती यामुळे वैयक्तिक आरोग्यमान खालावते आहे. त्याचा थेट परिणाम आयुर्मानावर होतो.

पाहा! बोलता बोलता 10 मिनिटे पुरतील इतके मुद्दे तयार झाले. यात अजूनही भर पडू शकेल. थोडक्यात म्हणजे प्रस्तावाला ‘कशामुळे?’ हा एकच प्रश्न विचारला तर आपल्याला हवी ती उत्तरे मिळू शकतील.

आता तुमचं मत ‘कुटुंब संस्था -हास पावत नाहीये’ असं असेल, तर? मुद्दे सहज सुचत आहेत? नसेल तर वेळ घ्या. स्वतंत्रपणे विचार करून बघा. तुम्ही प्रतिकूल बाजूचे मुद्दे मला ई-मेलमधूनही कळवू शकता.

जाता जाता एक टीप देतो - वाद स्पर्धेमध्ये प्रस्तावामधला प्रत्येक शब्द मोलाचा असतो बरं! अगदी ‘च’ सुद्धा!! एका स्पर्धेमध्ये प्रस्ताव होता - ‘प्रेम व्यक्त करायला 14 फेब्रुवारी हवाच’. ‘14 फेब्रुवारी हवा’ आणि ‘14 फेब्रुवारी हवाच’ यात सूक्ष्म पण भाषणावर परिणाम करणारा फरक आहे, हे तुमच्या लक्षात येतंय ना? या प्रस्तावाचेही मुद्दे काढा आणि मला कळवा बरं! पुन्हा भेटूच!


वक्तृत्व एक वेड आहे.... ती एक ओढ आहे, कला आहे, साधना आहे... महाराष्ट्राला वक्त्यांची महान परंपरा आहे. या वक्त्यांची जडन-घडण ही महाराष्ट्रात होणा-या शेकडो वक्तृत्व स्पर्धांमध्ये दडलेली आहे. आजसुद्धा हजारो मुलं या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून महान वक्ता होण्याची स्वप्ने बघत असतात.

स्पर्धेत सादर होणाऱ्या नाट्यप्रयोगात नग्नता, बिभत्सता, स्पष्ट लैंगिक गतिविधी यांचा समावेश नसावा तसेच धार्मिक भावना, जाती जमातीवर टीका टिपण्णीचा समावेश नसावा किंवा गोपनीयताचे उल्लंघन नसावे किंवा अवैध, अनैतिक तसेच सार्वजनिक हिताच्या विरूध्द कोणतेही घटक समाविष्ट नसावेत.